पाच वर्षांहून अधिक काळ आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे लक्षात घेऊन, मुंबई उच्च न्यायालयाने मुलीच्या जबाबासह सर्व नोंदी पाहिल्या. त्या जबाबात तिने आणि आरोपीने परस्पर संमतीने संबंध ठेवले असल्याचे नमूद होते.
2019 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या तरुणाला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पीडित मुलगी आरोपीच्या प्रेमात होती आणि तिने स्वेच्छेने त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
आरोपीला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती, त्यावेळी तो 19 वर्षांचा होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत बलात्कार व अपहरणाच्या आरोपांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
“निःसंशयपणे मुलगी अल्पवयीन होती. मात्र, या प्रकरणातील परिस्थिती पाहता तिला तिच्या कृतींचा पूर्ण अर्थ आणि परिणाम समजत होता. ती स्वतःहून आरोपीसोबत गेली आणि चार दिवस त्याच्यासोबत राहिली,” असे न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने नमूद केले की आरोपी पाच वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत आहे. पोक्सो कायदा कठोर असला तरी न्यायसंगत निर्णय घेण्यासाठी जामीन मंजूर करणे किंवा नाकारणे हे न्यायालयाच्या अधिकारात आहे.
मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, तिने घरी सांगितले होते की ती तिच्या विवाहित बहिणीकडे जात आहे. मात्र, ती तिथून निघून गेली आणि तीन-चार दिवस घरी परतली नाही. चार दिवसांनंतर वडिलांना ती आरोपीसोबत आढळून आली, त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
मुलीच्या वकिलांनी जामिनाला विरोध करताना सांगितले की, ती घटनेच्या वेळी केवळ 14 वर्षांची होती, त्यामुळे तिच्या संमतीला कायदेशीर महत्त्व नाही.
न्यायालयाने पुरावे पाहिले, ज्यात वैद्यकीय तपासणी अहवालाचा समावेश होता. या अहवालात मुलीने स्वतः कबूल केले होते की तिचे आरोपीसोबत परस्पर संमतीने संबंध होते. न्यायालयाने नमूद केले की तिच्या जबाब आणि एफआयआरमध्ये स्पष्ट तफावत आहे. तसेच, मुलीच्या वडिलांना तिच्या आणि आरोपीच्या नात्याची कल्पना असल्याचेही प्राथमिकदृष्ट्या आढळून आले.
न्यायमूर्ती जाधव यांनी यासह सुप्रीम कोर्ट आणि अन्य न्यायालयांनी अनेकदा “तरुण आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या बाजूने भूमिका घेतली आहे, जेणेकरून कारागृहातील नकारात्मक परिणामांपासून त्यांना वाचवता येईल आणि त्यांच्या हिताचा विचार करता येईल,” असे नमूद केले.



टिप्पणी पोस्ट करा