नेवासा | प्रतिनिधी | दि. १४ फेब्रुवारी २०२६
नेवासा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून ३ जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि सुझुकी कंपनीचे मालवाहू वाहन असा एकूण ४ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिस हवालदार शहाजी आंधळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुकाणा गावातील नेवासा फाटा ते शेवगाव रोडवरील कुकाणा दुरक्षेत्रासमोर एमएच १६ सीडी ४४०५ क्रमांकाच्या सुझुकी सुपर कॅरी सीएनजी मालवाहू वाहनातील एका इसमाकडे देशी बनावटीचे पिस्तुल आहे. माहितीची खातरजमा करून वरिष्ठांना कळविण्यात आले.
यानंतर पोलिसांनी दोन पंचांना बोलावून कुकाणा येथील तरवडी चौकात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहन येताच पोलिसांनी ते थांबवून चालकाची पंचांसमक्ष झडती घेतली. चालकाने आपले नाव संतोष कारभारी नरोटे (वय २२, रा. मोहरी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.
झडतीदरम्यान त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह आढळून आले. मॅगझीन तपासल्यावर त्यामध्ये तीन जिवंत काडतुसे सापडली. शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता आरोपी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पिस्तुल बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याची खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
जप्त मुद्देमाल:
५०,००० रुपये किंमतीचे स्टीलसदृश धातूचे, ब्राउन ग्रिप असलेले गावठी पिस्तुल
९०० रुपये किंमतीची तीन जिवंत काडतुसे
४,००,००० रुपये किंमतीची सुझुकी सुपर कॅरी सीएनजी मालवाहू गाडी (एमएच १६ सीडी ४४०५)
एकूण जप्तीची किंमत ४,५०,९०० रुपये आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल डमाळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १११/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, तसेच पोलिस पथकाने केली.
आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा