सुरेगाव (गंगा)मध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान

 

नेवासा तालुका | सुरेगाव (गंगा) गावात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून अनेक घरात दोन ते अडीच फूट पाणी शिरले आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि खायचे साहित्य पूर्णतः भिजून खराब झाले आहे. “आता काय खायचं? कसं जगायचं?” असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

फक्त घरातील साहित्यच नव्हे तर शेतात उभ्या असलेल्या पिकांनाही या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. ताली फुटल्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीसोबत आशा-स्वप्ने पाण्याखाली गेली आहेत.

गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे त्वरित नालेसफाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये. तसेच महसूल विभागाने पाणी शिरलेल्या घरांचे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

सुरेगाव (गंगा) येथील या भीषण परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून शासनाने त्वरित दखल घेऊन मदतीचे हात पुढे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




0/Post a Comment/Comments

Translate