नेवासा शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अपघातामुळे जीव धोक्यात आला आहे. घाणीचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित होऊन साथीचे रोगासारखी स्थिती निर्माण झाली आहे या सर्वांना नगरपंचायत जबाबदार आहे. नगरपंचायचा कारभार हा वाऱ्यावर सोडला गेला आहे. लवकरच यावर ठोस भूमिका घेण्यात येईल.-संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
नेवासा नगर पंचायत कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नेवासा शहरातील मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाल्याची बाब मांडण्यात आली आहे. या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका सतत निर्माण होत आहे.
श्री. अंजूम फारूक पटेल यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, या भागातील रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले असून त्यात पावसाचे पाणी साचून डबके तयार होत आहेत. या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती वाढत असून परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांना आधीच डासांच्या त्रासामुळे त्रस्त व्हावे लागत आहे.
स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा नगर प्रशासनाचे लक्ष वेधूनही ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा रस्ता पोलिस लाईन शेजारी असल्याने पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयही या समस्येला सामोरे जात आहेत. तरीदेखील प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संबंधित भागाची स्वच्छता करून तेथे तातडीने मुरूम टाकून रस्ता समतल करण्यात यावा. तसेच कायमस्वरूपी रस्त्याचे काम हाती घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छ वातावरणासाठी नगर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा नगर पंचायत समोर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शहर अध्यक्ष अंजुम पटेल यांनी दिला. या वेळी शहर उपाध्यक्ष कैलास बोर्डे, शरीफ पठाण, सुमित पटारे, अल्ताफ शेख यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा