शिर्डीजवळील अस्तगाव-निर्मळ पिंपरी भागात दिनांक १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान ह. भ. प. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार असून, परिसरात जोरदार तयारी सुरू आहे.
ही कथा जनसेवा फाउंडेशन, लोणी (विखे पाटील परिवार) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी ही कथा आयोजित केली जात आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन हे भक्तांसाठी अध्यात्मिक ऊर्जा आणि ज्ञानाचा महाप्रसाद ठरणार आहे.
७५ एकर परिसरात तीन भव्य मंडपांची उभारणी
कार्यक्रमासाठी सुमारे ७५ एकर परिसरात तीन विशाल वॉटरप्रूफ मंडप उभारले गेले असून, प्रत्येक मंडपात एक लाख भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, पिण्याचं पाणी, शौचालयं, पार्किंग, वैद्यकीय सुविधा यांचीही उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे.
या सर्व तयारीची पाहणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः केली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की,
"या कथेतलं मुख्य आकर्षण म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम दर्शनाचा दिव्य व साक्षांकित भव्य देखावा. हा कार्यक्रम भाविकांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे."
शिर्डीत भाविकांचा जनसागर उसळणार
११ ऑक्टोबर रोजी पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचं शिर्डीत आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी शिर्डी आणि राहता शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. कथा दररोज दुपारी १ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
पावसामुळे रद्द झालेल्या तीन कथांनंतर ही महाराष्ट्रातील पहिली कथा असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्सुकता आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रत्येक प्रवचनास तीन ते चार लाख भक्त उपस्थित असतात. त्यामुळे यावेळी शिर्डीत लाखो भक्तांचा जनसागर उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भव्य सोहळ्यास केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा