नेवासा नगरपंचायत निवडणूक: “पक्ष नव्हे, नवा चेहरा हवा” — नागरिकांची भूमिका स्पष्ट

नेवासा | येत्या २०२५ मधील नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नेवासा शहरात नागरिकांचा रोष उफाळून आला आहे. मागील दोन कार्यकाळात सत्तेत राहिलेल्या पक्षांनी शहराचा विकास थांबवून ठेवला आणि भ्रष्टाचाराला संरक्षण दिले, असा थेट आरोप शहरातील नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायत व नगरपंचायतीत पूर्वी निवडून गेलेल्या काही ‘माजी नेत्यांनी’ शहराला मागे ढकलले. शहरातील महत्वाची कामे कोणत्याही सक्षम ठेकेदारांना न देता स्वतःच्या नगरसेवकांना किंवा त्यांच्या ग्रुपला देण्यात आली. या व्यवहारामुळे कामांचा दर्जा सतत घसरत गेला आणि शहराला निकृष्ट दर्जाच्या कामांचा फटका बसला.

मागील पाच वर्षांचा कारभार नागरिकांच्या नाराजीचा मुख्य मुद्दा ठरला आहे. अडीच वर्ष भाजप सत्तेत होती आणि उर्वरित अडीच वर्ष क्रांतिकारी शेतकरी पक्ष. मात्र दोन्ही पक्षांनी एकच पद्धत कायम ठेवली. “नावं बदलली, पण काम करण्याची वृत्ती बदलली नाही,” असा नागरिकांचा आरोप आहे. अनेक महत्त्वाची कामे कागदावरच राहिली आणि ज्या काही कामांचे ठेके दिले गेले, तीच कामे वॉर्डातील नगरसेवकांच्या हातात देण्यात आली.

व्यावसायिक संकुलाचा मुद्दाही नागरिकांनी ठळकपणे मांडला. संकुल उभे राहून पाच वर्षे उलटली, परंतु त्याचे वाटप आजतागायत झालेले नाही. “सत्ता मिळाली, पण निर्णय घेण्याची हिंमत कुणाकडेच नव्हती,” असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शहराच्या आर्थिक प्रगतीला हे थांबलेले प्रकल्प थेट जबाबदार असल्याचे ते सांगतात.

नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, नेवासा शहराचा कारभार सतत बाहेरून नियंत्रित केला गेला. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी आणि पायाभूत सुविधा याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे शहरातील लोकांचा विद्यमान नगरसेवक आणि काही नव्या उमेदवारांवरील विश्वास पूर्णपणे ढासळला आहे.

याच पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी आवाहन केले आहे की, यंदाच्या निवडणुकीत ‘पक्ष नव्हे तर व्यक्ती’ महत्त्वाची असली पाहिजे. शहराशी नाळ जुळलेला, निर्णय घेऊ शकणारा आणि नेवासासाठी खरोखर काम करणारा तरुण उमेदवार निवडून द्यावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

संदीप आलवणे यांनी सांगितले, “नेवासा शहरातील मतदार सुजाण आहेत. या वेळेस जुन्या नेतृत्वाला धडा शिकवून शहराचा विचार करणाऱ्या तरुणांच्या हातात सत्ता द्या.”




0/Post a Comment/Comments

Translate