उमेदवारांची कॉपी-पेस्ट वचने, शिक्षण–आरोग्य गायब

नेवासा नगरपंचायत निवडणुकीचा माहोल रंगत चालला आहे आणि प्रत्येक पक्षाचे उमेदवार गावभर फिरत आहेत आपल्या नेहमीच्या वचनांची यादी घेऊन. पाणी वेळेवर देऊ, कचरा गाडी वेळेवर येईल, रस्ते आणि गटारे दुरुस्त करू, आणि वातावरण स्वच्छ ठेवू — हे वाक्यं इतक्या ठिकाणी आणि इतक्या वेळा ऐकायला मिळत आहेत की जणू सगळ्या पक्षांनी एकाच जाहीरनाम्याची कॉपी वापरली आहे असे वाटू लागले आहे.

परंतु या मोठमोठ्या आणि वारंवार ऐकू येणाऱ्या वचनांतून दोन सर्वात महत्त्वाचे मुद्दे अजूनही गायब आहेत. शिक्षण आणि आरोग्य यांच्याबद्दल कोणीही ठोस बोलत नाही. शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याबद्दल, विद्यार्थ्यांना भाषा, आयटी कौशल्ये किंवा स्किल डेव्हलपमेंट देण्याबद्दल कोणत्याही उमेदवाराच्या भाषणात चर्चा होत नाही. दवाखान्यातील सुविधा सुधारण्याबद्दल, रुग्णालयांना आवश्यक साधनसामग्री देण्याबद्दल किंवा नेवासात ट्रॉमा सेंटर उभे करण्याबद्दलही शांतता आहे.

 शिक्षणाचा विषय निवडणूक प्रचाराच्या भाषणात कुठेच दिसत नाही. अगदी आरोग्याबाबतही नगरपंचायत नागरिकांकडून आरोग्यकर वसूल करते, पण त्या पैशाचा उपयोग नेमका कसा होतो आणि पुढील काळात आरोग्य सेवा कशा सुधारतील यावर कोणताही उमेदवार स्पष्टपणे बोलत नाही.

या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांऐवजी प्रचारात मात्र भावनिक आणि नाट्यमय संवादांचा वर्षाव केला जात आहे. “हा माणूस आपल्या हक्काचा माणूस आहे” किंवा “रात्रीच्या बारा वाजता हाक मारा, आम्ही धावत येऊ” अशा संवादांना टाळ्या मिळत असल्या, तरी निवडणुकीनंतर शाळेत शिक्षक कमी आहेत का, दवाखान्यात औषधांची कमतरता आहे का, या खऱ्या समस्यांसाठी हे लोक धावून येतील का, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

दररोजच्या जीवनात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये आणखी एक मुद्दा म्हणजे सरकारी कार्यालयांची कामकाज पद्धत. साधा नागरिक गुन्ह्यात अडकलेला नसतानाही आयुष्यात किमान एकदा पोलीस स्टेशनला जायलाच लागतो — तेही फक्त डीजे परमिशन किंवा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसारख्या साध्या कारणांसाठी. लोकांना अपेक्षा असते की सरकारी कर्मचारी नम्रपणे, आदराने आणि वेळेत काम करतील. उमेदवारांनी सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती सुधारण्याबद्दल काहीच सांगितलेले नाही.

शाळांबाबतही अपेक्षा वेगळ्या आहेत. मुलांना मूल्यशिक्षण, संस्कार, आधुनिक कौशल्ये आणि योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. हे सर्व करण्यासाठी निधी नागरिकांकडून कररूपाने आधीच जात असतो, तरीही शाळांची गुणवत्ता वाढवण्याबद्दल उमेदवारांच्या भाषणात चर्चा होत नाही. यातून खरा प्रश्न असा उरतो की नेवासा नगरपंचायत निवडणुकीत कोणीतरी खरंच शिक्षण, आरोग्य, करांचा पारदर्शक वापर आणि जबाबदार प्रशासन यावर बोलेल का, की आपण पुन्हा त्याच वचनांचा ‘सीझन २’ पाहणार?

तोपर्यंत निवडणूक सभा रंगत राहतील, भाषणं गाजत राहतील आणि खरे मुद्दे मात्र शाळेच्या शेवटच्या बाकावर बसून हात वर करत राहतील.



0/Post a Comment/Comments

Translate