नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि भक्तांच्या मागणीनंतर अखेर नेवासा एसटी आगाराच्या वतीने श्रीक्षेत्र देवगड ते पंढरपूर विशेष बससेवा आज 22 जून 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेला श्री देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि आमदार श्री.विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला.
या बससेवेची अनेक दिवसांपासून भाविक-भक्तांकडून मागणी होती. अखेर ती प्रत्यक्षात येताच वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल पांडुरंगाचे दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमामुळे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांचं विशेष कौतुक होत आहे. जनतेच्या मागणीनुसार काम करताना त्यांनी दाखवलेली तत्परता आणि भक्तभावनेला दिलेला आदर यामुळे त्यांच्याबद्दल भाविकांमध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना आहे.


टिप्पणी पोस्ट करा