श्रीरामपूर शहरात बुधवारी (३१ डिसेंबर) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास जर्मन हॉस्पिटल परिसरात भर दिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत हाजी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना तीन ते चार गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.
गोळीबारानंतर जखमी जहागीरदार यांना तातडीने कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला.
प्रत्यक्षदर्शींनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपींच्या शोधासाठी नाकेबंदी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा हादरले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा