नेवासा प्रतिनिधी |सोमनाथ वाखुरे
श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी बाबाजी यांच्या मातोश्री सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) सकाळी ६.१४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते.
सरूबाई पेसोडे या धार्मिक वृत्तीच्या, साध्या आणि प्रेमळ स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच देवगड परिसरातील नागरिक, भाविक आणि संस्थानशी निगडित मंडळींमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह संपूर्ण भक्त परिवार शोकसागरात बुडाला आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले — भास्करगिरी बाबाजी, मधुकर पेसोडे — तसेच कन्या कमलबाई रायपुरे असा परिवार आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्यावर आज सायंकाळी ४.३० वाजता श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने देवगड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भाविकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा