मुंबई - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषणने जारी केलेल्या नव्या प्रशिक्षण परिपत्रकाचे अधिकारी व कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे. दि. ४ मे २०२६ रोजी मानव संसाधन विभागाने निर्गमित केलेल्या या परिपत्रकानुसार आता अधिकाऱ्यांना स्वतःला कोणत्या विषयांमध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, याची माहिती थेट मागविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण प्रक्रिया अधिक कर्मचारीभिमुख झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
महापारेषण ही राज्यातील अति उच्च दाबाने विद्युत पारेषण करणारी अग्रगण्य कंपनी असून कंपनीमध्ये विद्युत, स्थापत्य, संगणक, मानव संसाधन आणि वित्त विभागात सुमारे पाच हजार अधिकारी कार्यरत आहेत. यापूर्वी पारंपरिक स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र आता प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील तांत्रिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिकारी अधिक सक्षम होणार असल्याचे बोलले जात आहे.
या निर्णयामागे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कुमार, मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालक तथा अप्पर जिल्हाधिकारी सुचिता भिकाने तसेच मुख्य महाव्यवस्थापक राजू गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. प्रशिक्षणामुळे अधिकारी वर्गाची कार्यक्षमता, उत्पादकता आणि सुरक्षित कार्यपद्धतीत वाढ होण्यास मदत होणार असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठीही हे पाऊल उपयुक्त ठरणार आहे.
मानव संसाधन विभागाकडून कर्मचारी वर्गाच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न होत असल्याने फिल्डवरील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विविध कर्मचारी संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यातही अशाच सकारात्मक आणि कर्मचारीहिताच्या धोरणात्मक निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा