निघोज येथे नवरात्र उत्सवाची उत्साहात सुरुवात

 

निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे सोमवार, दिनांक 22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत असून, नवसाला पावणारी माता मळगंगा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

निघोज येथील माता मळगंगेचे भव्य मंदिर महाराष्ट्र शासनाने ‘ब वर्ग’ देवस्थान म्हणून मान्यता दिले असून त्यामुळे मंदिर परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत. मातेच्या कुंडातील रांजण खळगे याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झालेली आहे. तसेच या कुंडाचा उल्लेख शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये धड्यासारखा समाविष्ट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली येथे नियमितपणे आयोजित केल्या जातात. एका रात्रीत माता मळगंगेने कोरलेल्या कुंडाची आख्यायिका अतिशय पुरातन आणि विलोभनीय आहे.

ग्रामस्थांनी, श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने आणि मुंबईकर मंडळींनी मिळून मंदिर व परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. खासदार डॉ. निलेश लंके यांनी देवस्थानासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला असून, आमदार काशिनाथ दाते यांनीही आवश्यकतेनुसार निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

नवरात्र उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीची महाआरती दररोज पहाटे पाच वाजता व सायंकाळी सात वाजता केली जाते. दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

नवीन अध्यक्ष वसंतराव कवाद आणि उपाध्यक्ष अमृत रसाळ यांनी भाविकांच्या सोयीसाठी चोख तयारी केली असून, उत्सवाची व्यवस्था उत्तम प्रकारे पार पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर सचिव शांताराम कळसकर यांनी मळगंगा भोजनालय भाविकांसाठी सुरू असून, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

एकंदरीत, ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी व ट्रस्ट यांच्या पुढाकारामुळे नवरात्र उत्सव भव्यदिव्य होत असून, देवीची ज्योत घेऊन भक्त आपल्या गावात परत जातात व आराधना करतात. श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व ग्रामस्थांनी सर्वांना दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Translate